वाशिम -जिल्ह्यात शुक्रवारी २३ आणि गुरुवारी रात्री उशिरा ८ अशा एकूण ३१ रुग्णांची वाढ झाली आहे. १५ जण कोरोनामुक्त झाल्याने डिस्चार्ज देण्यात आला आहे. दिवसभरात एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
मंगरूळपीर कोविड केअर सेंटर येथे झालेल्या अँटीजेन रॅपिड टेस्टमध्ये एकूण ११ व्यक्ती बाधित आढळल्या आहेत. यापैकी १० व्यक्ती कारंजा लाड येथील बाधितांच्या संपर्कातील आहेत.
यवतमाळ वैद्यकीय प्रयोगशाळेत पाठवलेले ५ व्यक्तींच्या घशातील स्त्राव नमुन्याचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये मंगरूळपीर शहरातील पठाणपुरा येथील २ आणि कारंजा लाड शहरातील गायत्री नगर येथील १, जिजामाता चौक परिसरातील १ व चुना पुरा परिसरातील १ व्यक्तीचा समावेश आहे.
शुक्रवारी रात्री आणखी ७ व्यक्तींचे कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये वाशिम तालुक्यातील ४ व रिसोड तालुक्यातील ३ व्यक्तींचा समावेश आहे. वाशिम शहरातील नवीन आययुडीपी परिसरातील १ आणि तोंडगाव (ता. वाशिम) येथील ३ व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचे निदान झाले आहे. तसेच रिसोड शहरातील इंदिरा नगर येथील १, मांगवाडी येथील १ आणि वनोजा (ता. रिसोड) येथील १ व्यक्तीला कोरोना विषाणू संसर्ग झाला आहे.
गुरुवारी रात्री उशिरा रिसोड तालुक्यातील ८ व्यक्तींचे कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये रिसोड शहरातील सिव्हील लाईन्स परिसरातील ०३, गजानन नगर परिसरातील ०३, मांगवाडी येथील ०१ आणि वनोजा (ता. रिसोड) येथील ०१ व्यक्तीचा समावेश आहे.
वाशिम शहरातील गवळीपुरा परिसरातील ७, मोठा गवळीपुरा येथील १, हकीमअली नगर येथील ३, गंगू प्लॉट येथील २, मंगरूळपीर शहरातील मदार तकिया, माळीपुरा येथील १ आणि चौसाळा (ता. मानोरा) येथील १ अशा एकूण १५ व्यक्तींना उपचारानंतर आज रुग्णालयातून घरी सोडण्यात आले.
अँटीजेन रॅपिड टेस्टमध्ये कोरोनाबाधित असल्याचे निदान झालेल्या शिरपूर जैन (ता. मालेगाव) येथील व्यक्तीचा शुक्रवारी दुपारी जिल्हा कोविड रुग्णालयात मृत्यू झाला. या व्यक्तीला गुरुवारी( १६ जुलै) सकाळी ११ वा. रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी त्याची तब्येत पूर्णतः खालावलेली होती. अँटीजेन रॅपिड टेस्टमध्ये त्याला कोरोना विषाणू संसर्गाचे निदान झाले. सदर व्यक्तीला श्वास घेण्यास त्रास होत होता, तसेच शरीरातील ऑक्सिजन पातळी कमी झाली होती. सदर व्यक्तीला अगोदरपासूनच किडनीचा आजार होता, त्याची किडनी निकामी झाली होती. तसेच त्याला रक्तदाब सुद्धा होता. उपचारादरम्यान दुपारी त्याचा मृत्यू झाला.
वाशिम जिल्ह्यात एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या ३४० वर पोहोचली असून ७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे तर २१३ रुग्ण जिल्हा सामान्य रुग्णालयातील केविड सेंटरमध्ये उपचार घेत आहेत.