वाशिम- एनसीबी अधिकारी समीर वानखेडे याच्या समर्थनार्थ वाशिम जिल्ह्यातील त्यांच्या मूळ गाव असलेल्या वरुड तोफा गावातील नातेवाईक अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक याच्या विरोधात आक्रमक झाले आहेत. वाशिम शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला हार घालत चौकातून निषेध मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या विरोधात वाशिम पोलीस स्टेशनमध्ये अट्रॉसिटी कायदा अंतर्गत गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी निवेदन देण्यात आले.
समीर वानखेडे यांच्या गावातील नातेवाईकांचा अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिकांच्या विरोधात मोर्चा समीर वानखेडे यांच्यावर गेल्या महिनाभरापासून सतत मंत्री नवाब मलिक हे त्यांच्या विरोधात बोलत आहेत. नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्या विरोधात बोलणे बंद केले नाही. तर महाराष्ट्रभरात त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करणार असल्याचे त्यांचे नातेवाईक रोहित वानखेडे यांनी सांगितलं. वाशिम शहर पोलीस ठाण्यात समीर वानखेडे यांच्या नातेवाईकांनी निवेदन दिले असून वरीष्ठ स्तरावर पाठवणार असल्याचे पोलीस निरीक्षक ध्रुवास बावनकर यांनी सांगितले.
समीर वानखेडे अमली पदार्थ प्रकरणांचे स्पेशालिस्ट
समीर वानखेडे एनसीबीच्या मुंबई कार्यालयातील प्रादेशिक संचालक आहेत. सप्टेंबर 2020 मध्ये त्यांची महसूल गुप्तचर संचालनालयातून एनसीबीवर बदली झाली होती. अमली पदार्थांशी निगडीत प्रकरणांचे तज्ज्ञ म्हणून त्यांची ओळख आहे. गेल्या दोन वर्षांत त्यांच्या नेतृत्वात एनसीबीने कोट्यवधींच्या ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे.
2004 मधील बॅचचे आयआरएस अधिकारी
समीर वानखेडे हे मूळचे महाराष्ट्रातील असून 2004 च्या बॅचचे आयआरएस अधिकारी आहेत. सुरूवातीला त्यांची मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल उपायुक्त म्हणून नियुक्ती झाली होती. कामातील नैपुण्य बघून त्यांना विभागाने काही प्रकरणांच्या तपासासाठी आंध्र प्रदेश आणि दिल्लीतही पाठविले होते. अमली पदार्थांशी निगडीत बाबींचे तज्ज्ञ म्हणून वानखेडेंची ओळख आहे. नोव्हेंबर 2020 मध्ये मुंबईतील एका ड्रग्स प्रकरणाशी निगडीत कारवाईदरम्यान समीर वानखेडे आणि त्यांच्या पथकावर हल्लाही झाल्याचे काही मीडिया रिपोर्टमध्ये म्हटले होते.