वाशिम : प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी विमा हप्ता व प्रस्ताव सादर करण्याची अंतिम मुदत ३१ जुलै २०२० पर्यंत आहे. जिल्ह्यातील सर्व महा ई-सेवा केंद्र, सामुहिक सुविधा केंद्रावर पीक विमा प्रस्ताव व विमा हप्ता भरण्याची सुविधा उपलब्ध आहे. या योजनेपासून शेतकरी वंचित राहू नयेत, जिल्ह्यातील सर्व महा ई-सेवा केंद्र, सामुहिक सुविधा केंद्र रात्री १० वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे.
याबाबतचे आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी २१ जुलै रोजी निर्गमित केले आहेत. सोयाबीन, कापूस, तूर, मुग, उडीद व खरीप ज्वारी पिकाचा प्रधानमंत्री विमा पीक योजनेत समावेश असून जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील सर्व मंडळांना ही योजना लागू आहे. तसेच अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिके घेणारे कुळाने अगर भाडेपट्ट्याने जमीन करणाऱ्या शेतकऱ्यांसह सर्व शेतकरी प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी पात्र आहेत. प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी विहित प्रपत्रात नजीकच्या सामुहिक सुविधा केंद्र व बँकेकडे विमा प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे. प्रस्तावासोबत सातबारा, आधारकार्ड, पिक पाहणी झाली असल्यास पिकांची पेरणीबाबतचे स्वयंघोषणापत्र जोडणे आवश्यक आहे. तसेच शेतकऱ्यांचे संबंधित बँकेत खाते असणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी तालुका कृषि अधिकारी कार्यालय, कृषि सहायक, कृषि पर्यवेक्षक, मंडळ कृषि अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.