वाशिम - देशभरात कोरोनामुळे हाहाकार माजला आहे. त्यामुळे महामारीचा प्रसार रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरू आहे. या लॉकडाऊनचच्या काळात काम नसल्याने मानोरा तालुक्यातील कारखेडा येथील एका दाम्पत्याने अंगणात चक्क २५ फूट विहीर खोदण्याची किमया केली. हे काम २१ दिवसात पूर्ण झाले असून त्यांच्या मेहनतीला फळ मिळाले आहे.
लॉकडाऊनमधला 'मांझी', २१ दिवसात खोदली २५ फूट विहीर - विहीर स्टोरी वाशिम
मानोरा तालुक्यातील कारखेडा येथील गजानन पकमोडे हे गवंडी काम करतात. मात्र, राज्यात लॉकडाऊन असल्याने काम बंद असून जिल्हा प्रशासनाने बाहेर न पडण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे घरच्या घरी काही तरी करायचे हा हेतू समोर ठेवून या दाम्पत्याने पाणी टंचाईवर मात करण्यासाठी विहीर खोदण्याचा निर्णय घेतला आणि चक्क 21 दिवसाच्या लॉकडाऊन मध्ये पूर्णही केला आहे.
गजानन पकमोड आणि पुष्पा पकमोडे, असे दाम्पत्याचे नाव आहे. गजानन हे गवंडी काम करतात. मात्र, लॉकडाऊनमुळे सर्व कामकाज बंद आहेत. त्यामुळे घरात राहून करायचे काय? असा प्रश्न त्यांच्यासमोर होता. तसेच कारखेडा गावात मागील अनेक दिवसांपासून भीषण पाणी टंचाई आहे. त्यामुळे गावातील नागरिक त्रस्त होते. मात्र, कोरोना विषाणुमुळे आलेल्या लॉकडाऊनमुळे एक संधी समजत पकमोडे दाम्पत्याने विचार करून आपल्या घराच्या अंगणात विहीर खोदण्याचे ठरविले. त्यानुसार लॉकडाऊनच्या 21 दिवसात 25 फूट खोल विहीर खोदली आणि नशिबाने साथ देत त्या विहिरीला चांगले पाणी लागले. त्यामुळे कोरोनाच्या संकटात असलेल्या इतर नागरिकांना त्रास होत असला, तरी लॉकडाऊनमुळे पकमोडे कुटुंबाचा मात्र जीवनभर पाण्याचा प्रश्न मिटला आहे. या कार्यामुळे ग्रामस्थांकडून त्यांचे कौतुक केले जात आहे.