वाशिम - जिल्ह्यातील अंशतः अनुदानित, अघोषित, त्रुटी अपात्र शाळांना 100 टक्के प्रचलित नियमानुसार अनुदान देण्यासाठी सरकारकडून दिरंगाई केली जात आहे. त्यामुळे हजारो शिक्षकांवर पुन्हा आर्थिक संकटे ओढावली आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील विनाअनुदानित शाळातील शेकडो शिक्षकांनी आज स्वातंत्र्य दिनानिमित्त अमरावती विभागातील शिक्षक आमदार किरणराव सरनाईक यांच्या घरासमोर आंदोलन केले. यावेळी शिक्षकांनी घोषणाबाजीही केली.
यापूर्वी शिक्षकांचा इशारा
'विनाअनुदानित शिक्षकांवर गेल्या 20 वर्षांपासून सातत्याने अन्याय होत आहे. सर्वच विनाअनुदानित शाळा 100 टक्के प्रचलित नियमानुसार अनुदानास पात्र आहेत. काहींना 20 टक्के तर काहींना 40 टक्के अनुदान देऊन शासनाने आमची बोळवण केली आहे. बऱ्याच शाळांना अजून एक रुपया देखील अनुदान नाही. यामुळे हे घंटानाद आंदोलन करून आम्ही सरकारला जागे करणार आहे', असे शाळा कृती समितींकडून सांगण्यात आले होते. 15 ऑगस्टपूर्वी आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर 15 ऑगस्टपासून राज्यातील सर्व शिक्षक आमदारांच्या दारात बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा समितीकडून देण्यात आला होता.