वाशिम - मालेगाव तालुक्यातल्या गोकसावंगी गावात गेल्या अनेक दिवसांपासून वीज नाही. ग्रामस्थांची दिवाळी देखील अंधारातच गेली. वारंवार महावितरणकडे मागणी करून देखील विजेची सोय होत नसल्याने, अखेर आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने महावितरण कंपनीच्या परिसरात आंदोलन करण्यात आले. यावेळी स्वाभिमानीच्यावतीने उपकार्यकारी अभियंता अनिल जीवनानी यांच्या खुर्चीला हार घालून निषेध करण्यात आला.
गोकसावंगी येथील अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतात विविध पिकांची लागवड केली असून, या पिकाला पाणी देण्यासाठी वेळेवर वीज मिळत नसल्याने पीके धोक्यात आली आहेत. याबाबत शेतकऱ्यांनी महावितरणला वारंवार निवेदने दिली. मात्र तरी देखील कायमस्वरूपी वीजपुरवठा होत नसल्याने अखेर आज या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोेलन करण्यात आले.