वाशिम - केंद्राने राज्यातील रुग्णसंख्येत घट होत असलेल्या 12 जिल्ह्यात वाशिम जिल्ह्याचा समावेश केला आहे. मात्र मागील 5 दिवसात जिल्ह्यात कोरोनाचा वाढता आलेख बघता पुन्हा जिल्हा प्रशासनाला कडक लॉकडाऊन करण्याची वेळ आली आहे. कोरोना विषाणू संसर्गाची साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्ह्यात आज (9 मे) दुपारी 12 वाजल्यापासून 15 मे पर्यंत 6 दिवसाचा संपूर्ण लॉकडाऊन लागू केला आहे.
यामध्ये अत्यावश्यक सेवेतील किराणा दुकान, भाजीपाला, फळे आणि दूध घरपोच सेवा हे सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. तसेच या कालावधीत विनाकारण फिरणाऱ्यांवर कडक कारवाईचे आदेश जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस यांनी दिले आहेत. वाशिमच्या व्यापाऱ्यांनी अत्यावश्यक सेवांची सर्व आस्थापने बंद केली आहेत.