वाशिम- मागील तीन वर्षांपासून सततची नापिकीमुळे शेतकरी हैराण झाला आहे. मागील सरकारने कर्जमाफी करणार असल्याचे सांगितले, पण ती झाली नाही. आता नव्याने महाविकास आघाडीचे सरकार आले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची भरपाई हेक्टरी 25 हजार रुपये देणार असल्याचे सांगितले होते. मात्र, अजून मिळाली नाही. त्यामुळे वाशिम जिल्ह्यातील कोळगाव येथील विजय शेंडगे या शेतकरी पुत्राने आपल्या शेतात फलक लावून चक्क आपले कुटुंब विक्रीला काढले आहे. 'माझा परिवार विकत घ्या मात्र, माझी शेती वाचावा' अशी आर्त याचना फलक लावून सरकारला केली आहे.
हेही वाचा -#FASTAG : फास्टॅग वापराबाबत वाहनधारकांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया
शेतकरी पुत्र विजय शेंडगे हे मालेगाव तालुक्यातील कोळगाव येथील रहिवासी आहेत. त्यांच्या आजोबांच्या नावावर् सात एकर कोरडवाहू शेती आहे. या शेतीवर चार लाख 50 हजार रुपये कर्ज आहे. मागील तीन वर्षांपासून दुष्काळ आहे. या परिस्थितीत पीक विमा भरूनही अद्याप मदत मिळाली नाही. त्यामुळे हाताश होऊन शेती जगवण्यासाठी परिवार विक्रीला काढला असल्याचे विजय शेंडगे यांनी सांगितले.