वाशिम- जिल्ह्यात पावसाने उघडीप दिल्यामुळे सोयाबीन काढणीला वेग आला आहे. त्याच बरोबर रब्बी हंगामातील पेरणीसाठी बियाणे आणि खत खरेदीसाठी सध्या शेतकऱ्यांकडे आर्थिक चणचण निर्माण झाली आहे. त्यामुळे सोयाबीन विक्रीतून पैसा मिळवण्यासाठी शेतकऱ्याची लगबग सुरू आहे. परिणामी जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात आवक होत आहे.
शनिवारी मंगरुळपीर कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत येत असलेल्या उपबाजार समिती शेलुबाजार येथे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सोयाबीन विक्रीला आणले होते. त्यामुळं बाजार समिती परिसरात लांबच लांब रांगा लागल्याच दिसून आले.
रब्बी हंगामासाठी लगबग-
अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यातच सोयाबीनची मळणीही अनेक ठिकाणी झालेल्या नाहीत. तर काहीच्या काढण्या खोळंबल्या होत्या. आता पावसाने उघड दिल्याने सोयाबीनच्या काढणी आणि मळणीला वेग आला आहे. तसेच सोयाबीन काढून उशिराका होईना रब्बी हंगामातील पिके घेण्यासाठी शेतकरी प्रयत्नशील आहे. मात्र अतिवृष्टीने नुकसान झाल्याने सध्या आर्थिक चणचण निर्माण झाली आहे. त्यामुळे रब्बीची कामे उरकून बी-बियाणे खरेदी करण्यासाठी सोयाबीन विक्री करण्याकडे शेतकऱ्यांचा भर दिसून येत आहे.
सोयाबीनच्या पेरणी क्षेत्रात विभागात वाशिम जिल्हा दुसऱ्या स्थानी आहे. त्यामुळे या जिल्ह्यात सोयाबीनचे उत्पादन मोठ्या प्रमाणात असून, यंदा जिल्ह्यात पावणे तीन लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावर या पिकाची पेरणी झाली होती. त्याची काढणी पूर्ण उरकली आहे. त्यानंतर शेतकऱ्यांनी सोयाबीन सुकवून ते विकण्यासाठी बाजारात न्यायला सुरुवात केली आहे. परिणामी बाजार समितीत सोयाबीनची आवक वाढलेली दिसून येत आहे.