वाशिम- कारंजा शहरात स्वच्छतेसाठी 13 मेपासून कांगारपुऱ्यातील सार्वजनिक शौचालयाच्या छतावर छगन वाघमारे यांनी आमरण उपोषणास सुरूवात केली. या उपोषणाचा आज तिसरा दिवस असून वाघमारे यांची वाढत्या तापमानामुळे प्रकृती बिघडली आहे. डॉक्टरांनी त्यांची तपासणी करून त्यांना तत्काळ शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. मात्र रुग्णालयातही उपोषण सुरूच राहणार असल्याचा निर्णय सामाजिक कार्यकर्ते छगन वाघमारे यांनी घेतला आहे.
स्वच्छतेसाठी छगन वाघमारेंचे रुग्णालयातही उपोषण सुरूच
कांगारपुऱ्यातील सार्वजनिक शौचालयाच्या छतावर छगन वाघमारे यांनी आमरण उपोषणास सुरूवात केली. प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र रुग्णालयातही उपोषण करण्याचा निर्णय वाघमारे यांनी घेतला आहे.
कांरजा शहरातील कांगारपुरा भागातील सांडपाण्याच्या नाल्यांसह सार्वजनिक शौचालयाची कित्येक दिवसांपासून स्वच्छता करण्यात आली नाही. त्यामुळे परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. या परिसरातील रहिवाशांना आपल्या घरात राहणे कठीण झाले आहे. यासंदर्भात साफसफाई करण्यासाठी स्थानिक न. प. प्रशासनाला येथील रहिवाशांनी वेळोवेळी निवेदने दिली. परंतु त्याचा काहीही फायदा न झाल्याने अखेर सामाजिक कार्यकर्ते छगन वाघमारे यांनी आमरण उपोषणाचे हत्यार उपसले. साफसफाईच्या मागणीव्यतिरिक्त स्थानिक न. प. मधील संबंधित विभागातील खातेप्रमुख व कर्मचारी यांची खातेनिहाय चैकशी करण्याची मागणीदेखील वाघमारे यांनी केली आहे.
जोपर्यंत प्रश्न मार्गी लागत नाहीत, तोपर्यंत उपोषण सोडणार नसल्याची माहिती यावेळी वाघमारेंनी दिली.