वाशिम - जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला आहे. शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली आहे, मात्र सोयाबीन बियाणे आणि डीएपी खतांची टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची खते, बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू झाली आहे. कृषी विभागाने याकडे लक्ष देऊन टंचाई दूर करून बियाणे उपलब्ध करून द्यावे अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
बियाणे मिळत नसल्याने शेतकरी हतबल -
वाशिम जिल्हा सोयाबीनचा बेल्ट म्हणून ओळखल्या जातो. जिल्ह्यात एकूण पेरणी योग्य क्षेत्र चार लाख असून, त्यापैकी जवळपास तीन लाख हेक्टरवर सोयाबीनची पेरणी केली जाते. त्यात सर्वाधिक 335 आणि 9305 या वाणाची पेरणी केली जाते. त्यामुळे या वाणाची मागणी जास्त असल्याने टंचाई निर्माण झाली आहे. परिणामी शेतकऱ्यांना बियाणे मिळत नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे.