वाशिम - कोरोना संसर्ग प्रतिबंधासाठी जिल्ह्यात ‘ब्रेक दि चेन’ अंतर्गत नवीन नियमावली लागू करण्यात आली आहे. यानुसार अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने 30 एप्रिल, 2021 पर्यंत बंद राहणार आहेत. याबाबतचे आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी 5 एप्रिलला निर्गमित केले आहेत.
या आदेशानुसार रात्री 8 ते सकाळी 7 वाजेपर्यंत जिल्ह्यात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (1)(2)(3) अन्वये संचारबंदी लागू असेल. संचारबंदीचे उल्लंघन केल्यास प्रतिव्यक्ती एक हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे. तसेच दर आठवड्याच्या सोमवार ते शुक्रवारपर्यंत सकाळी 7 ते रात्री 8 वाजेपर्यंत जमावबंदी लागू राहणार असून या कालावधीत पाचपेक्षा अधिक व्यक्तींना एकत्रित फिरता येणार नाही किंवा एकत्रित जमता येणार नाही. प्रत्येक शुक्रवारी रात्री 8 ते सोमवारी सकाळी 7 वाजेपर्यंत कोणत्याही व्यक्तीला अत्यावश्यक कारणाशिवाय किंवा परवानगीशिवाय बाहेर फिरता येणार नाही. वैद्यकीय व त्यासंबंधीच्या सेवा जसे दवाखाने, चिकित्सा केंद्रे, क्लिनिक, वैद्यकीय विमा कार्यालये, फार्मसी, औषधी कंपन्या, इतर वैद्यकीय व आरोग्य सेवा निर्बंधाशिवाय 24 तास सुरू राहतील.