वाशिम - माटोंकार्लो कंन्स्ट्रक्शन कंपनीच्या चुकीच्या कामामुळे अपघात होत आहेत. या अपघातामध्ये मृत्यु झालेली महिला पोलीस व अनेक अपघातग्रस्तांच्या न्याय मागणीसाठी बुधवारी दि. 23 रोजी परांडे जांभरूननजीक पुलावर शिवसेनेसह नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केले.
रस्त्याच्या चुकीच्या कामामुळे अनेकांचे अपघात-
यावेळी पोलीस दलातील कार्यरत महिला पोलीस जया खराटे यांच्या कुटूंबाला न्याय मिळालाच पाहिजे. माटोंकार्लो कंपनीवर मनुष्यवधाचे गुन्हे दाखल झाले पाहिजे. मृत्युपावलेल्या कुटूंबांना तत्काळ मदत देण्यात यावी, आदी मागण्या यावेळी शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांनी लावून धरल्या. शिवसेना तालुका प्रमुख महादेवराव ठाकरे, युवा सेना उपजिल्हाप्रमुख प्रदीप मोरे यांनी आपल्या भाषणातून माटोंकार्लो कंपनीवर सडकून टिका करून आतापर्यंत माटोंकार्लो कंपनीच्या वाहनाने एक महिला व एक पुरूषाचा बळी घेतला. तर दुसरा बळी जया खराटे यांचा घेतला. रस्त्याच्या चुकीच्या कामामुळे अनेकांचे अपघात होवून ते जखमी झाले. तर कंपनीचे टिप्पर रात्री-बेरात्री गौणखनिजाची ने-आण करीत आहे. नियम डावलून ही कंपनी काम करीत असल्यामुळे पोलीस प्रशासनाने याची दखल घेवून त्यांच्यावर कार्यवाही करावी, अशी मागणी यावेळी त्यांनी व्यक्त केली आहे.