वाशिम - 'ऊन, वारा, पावसात रस्त्यावर उभा राहून पोलीस बांधव आपले कर्तव्य बजावतात. या पोलिसांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असून आगामी काळात पोलिसांच्या निवासस्थानांचा प्रश्न मार्गी लावण्यास प्राधान्य देणार आहे. असे प्रतिपादन गृह (ग्रामीण), वित्त, नियोजन, राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास व उद्योजकता राज्यमंत्री तथा वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई यांनी केले. काल १४ ऑगस्टला कारंजा लाड येथे उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय नूतन इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
पालकमंत्री देसाई म्हणाले, यंदाच्या अर्थसंकल्पात पोलिसांच्या निवासस्थानांसाठी भरीव तरतूद करण्यात आली होती. मात्र, सध्या कोरोनाला रोखण्यासाठी उपाययोजना करण्यावर शासनाचा भर आहे. कोरोनाचे हे संकट टळल्यानंतर नवीन कामांना मंजुरी देताना पोलिसांच्या निवासस्थानांना प्राधान्य देण्यात येईल. विशेषतः वाशिम जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून जिल्ह्यातील निवासस्थानांच्या कामांसाठी तसेच इतर सुविधा निर्मितीसाठी अधिक निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले. कारंजा लाड येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाला नवीन इमारत मिळाल्याने चांगली सुविधा निर्माण झाली आहे. त्यामुळे पोलिसांनी अधिक जोमाने काम करीत गुन्हेगारांवर वचक निर्माण करून जनतेच्या तक्रारींची सोडवणूक करावी, असे पालकमंत्री श्री. देसाई यावेळी म्हणाले.
हेही वाचा -कॅनडास्थित भारतीयांना राज ठाकरेंनी दिल्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा