वाशिम - नागपूर प्रादेशिक हवामान अंदाज केंद्राने जिल्ह्यात ११ जून ते १४ जून या कालावधीत वादळी वारे व विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. १२ व १३ जून रोजी अतिवृष्टीची शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे नागरिकांनी तसेच शेतकरी बांधवांनी सतर्क राहावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांनी केले आहे.
पुढील चार दिवस पावसाचे; नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन - वाशिममध्ये पावसाची शक्यता
पुढील चार दिवस पावसाचे असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. यामुळे नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन हिंगे यांनी केले आहे.
हिंगे यांचे आवाहन -
विजांचा कडकडाट सुरू असताना नागरिकांनी घराबाहेर जाणे टाळावे, जनावरे झाडाखाली, पाण्याच्या स्त्रोताजवळ, विद्युत खांबाजवळ बांधू नयेत. त्यांना सुरक्षित ठिकाणी बांधावे. जनावरांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करून स्वतः सुरक्षित ठिकाणाचा आसरा घ्यावा. झाडाखाली थांबू नये. जलसाठा जवळ, नदी जवळ जाऊ नये. लहान मुलांना जलसाठ्यावर, नदीवर पोहण्यासाठी पाठवू नये. पुलावरून तसेच नाल्यावरून पाणी वाहत असताना कोणीही स्वतः किंवा वाहनासह पुल, नाला ओलांडण्याचा प्रयत्न करू नये. पाऊस सुरू असताना विजेच्या तारा, जुन्या इमारती कोसळण्याची शक्यता असते तरी त्यापासून दूर राहण्याची खबरदारी घ्यावी, असे आवाहन हिंगे यांनी केले आहे.