वाशिम-शिवसेना नेते आणि वनमंत्री संजय राठोड सहकुटुंब पोहरादेवीला जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. येत्या मंगवारी (२३ फेब्रुवारी ) ते पोहरादेवीच्या दर्शनासाठी येणार आहेत. मात्र, दर्शनासाठी येणारे संजय राठोड हे पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावर माध्यमांसमोर बोलतील का? याबाबत प्रश्नचिन्ह आहे.
वनमंत्री संजय राठोड सहकुटुंब पोहरादेवीला जाणार - वनमंत्री संजय राठोड लेटेस्ट न्यूज
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात संशयाच्या भोवऱ्यात अडकलेले राठोड पहिल्यांदाच प्रसारमाध्यमांसमोर येण्याची शक्यता आहे.
धर्म पिठावर महंतांची बैठक
बंजारा समाजाची काशी पोहरादेवी येथे धर्म पिठावर महंतांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीनंतर बंजारा समाजाचे धर्मपिठाधीशकारी बाबुसिंग महाराज, महंत सुनील महाराज व महंत जितेंद्र महाराज यांच्या उपस्थितीत वन मंत्री संजय राठोड हे मंगळवारी 23 तारखेला साडे अकरा वाजता पोहरादेवी येथे येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले..
बीड जिल्ह्यातील परळीमधील पूजा चव्हाण या २२ वर्षाच्या तरुणीचा रविवारी (दि. ७ फेब्रुवारी) इमारतीच्या बाल्कनीतून पडून मृत्यू झाला. ही हत्या की आत्महत्या यावरुन समाज माध्यमांमध्ये चर्चा सुरू आहे. या आत्महत्या प्रकरणाचा शिवसेना नेते संजय राठोड यांचा संबंध असल्याचा आरोप विरोधी पक्षाने केला आहे. या घटनेनंतर संपूर्ण राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. तरुणीचे काही कॉल रेकॉर्डिंग पोलिसांच्या हाती लागले आहेत. त्यावरुन पूजाने एका मंत्र्यांच्या दबावातून आत्महत्या केल्याचा आरोप विरोधी पक्षाने केला आहे. या प्रकरणात पोलिसांवर राजकीय दबाव असून पूजाच्या मोबाईल आणि लॅपटॉपमधील अनेक गोष्टी दडवण्याचा प्रयत्न होत असल्याचा संशय भाजपने व्यक्त केला आहे.