वाशिम- निसर्गाचा समतोल बिघडल्यामुळे पारंपरिक शेती अडचणीत आली आहे. मात्र, मालेगाव येथील सेवानिवृत्त शिक्षक मोहम्मद उमदराज मालवी या प्रयोगशील शेतकऱ्याने नैसर्गिक आपत्तीतून मार्ग शोधला. शेतात पिकेल ते पिकविण्यापेक्षा बाजारात विकेल तेच पिकविण्याचा त्यांनी निर्णय घेतला. यासाठी त्यांनी पारंपरिक शेतीला फाटा देत आधुनिक शेतीची कास धरून केसर आंब्याची बाग फुलविली आहे. यंदाच्या अनुकूल वातावरणामुळे आंब्याची बाग मोहरल्याने अपेक्षित उत्पादनाची अपेक्षा उंचावली आहे.
मागील सहा वर्षांपासून निसर्गाचा समतोल बिघडल्यामुळे शेतीपासून शाश्वत उत्पन्नाची हमी उरली नाही. परिणामी, दुष्काळात होरपळत असलेल्या या जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र आहे. मात्र, येथील शेतकरी उमदराज मालवी या 76 वर्षीय सेवानिवृत्त शिक्षकाने निसर्गावर मात करत जिद्द व चिकाटीच्या जोरावर केसर आंब्याची बाग फुलविली आहे.