वाशिम- मालेगाव तालुक्यातील ग्रामीण भाग हा पर्यावरणीय दृष्ट्या विविधतेने नटलेला व संपन्न असा परिसर आहे. त्यातही पांगराबीट या ठिकाणचे सर्वांना आकर्षण असते. कारण येथे नानाविध प्रजातीचे साप, पशुपक्षी सरपटणारे प्राणी याबरोबरच बिबट्यासारख्या वन्यजीवांचे निवासस्थान आहे. या परिसरात सध्या श्यामेलिओनने दर्शन देऊन अधिकच भर घातली आहे. शुक्रवारी दुपारी हा श्यामेलिओन सरडा ब्राम्हणवाडा परिसरात आढळून आला.
मालेगाव तालुक्यात आढळला दुर्मिळ श्यामेलिओन जातीचा सरडा
मालेगाव तालुक्यातील ग्रामीण भागात नानाविधी प्रजातीचे साप, पशुपक्षी सरपटणारे प्राणी याबरोबरच बिबट्यासारखे वन्यजीव आढळतात. भ्रमंती करताना एका व्यक्तीस शुक्रवारी दुपारी ब्राम्हणवाडा परिसरात श्यामेलिओन जातीचा सरडा आढळून आला.
श्यामेलिओन किंवा कॅमेलिअन म्हणजे हिरवा सरडा अर्थातच रंग बदलणारा सरडा. सरड्यांच्या काही जाती त्वचेचा रंग बदलू शकतात. श्यामेलिअन सरडा अतिशय शांत आणि बिनविषारी जीव आहे. या सरड्याला रंग बदलणारा गिरगीट किंवा हरण सरडा असे म्हणूनही ओळखले जाते. बरेचसे लोक याचा उच्चार चमेलिओन असाही करतात. संपुर्ण भारतभर विविध जातीचे सरडे आढळतात. खास म्हणजे अगदी हिमालयाच्या पाच हजार मीटर उंचीपासुन ते राजस्थानच्या उष्ण अशा वाळवंटी तापमानातही सरडे आढळतात.
सरड्यांच्या गडद रंगामुळे हा कॅमेलिअन सरडा खूप विषारी असतो, असा समज ग्रामीण भागात प्रचलित आहे. त्यामुळे काहीवेळा हा सरडा दिसला की मारून देखील टाकला जातो. वास्तविक हा एक अतिशय शांत आणि बिनविषारी जीव आहे. हा सरडा दिवसेंदिवस दुर्मिळ होत चालला असून याला घाबरून न जाता याच्या संवर्धनासाठी पुढे यावे. तरच अशा जीवांचे संवर्धन होईल. वत्सगुल्म जैवविविधता संवर्धन संस्थेचे शिवाजी बळी यांना हा सरडा निदर्शनास आला.