वाशिम - कोरोनाने सर्वत्र हाहाकार माजवला आहे. त्यामुळे गेल्या दीड वर्षांपासून लॉकडाऊन आहे. सध्या कोरोना रुग्णसंख्या कमी होत असल्याने निर्बंध कमी केले जात आहेत. मात्र, या लॉकडाऊनमुळे अनेकांना आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवायची संधी मिळाली. काही जणांनी या मिळालेल्या वेळाचा सदुपयोग केला आहे. वाशिम जिल्ह्यातील जामखेड येथील पोफळे कुटुंबियानेही या मिळालेल्या वेळेचा योग्य वापर केला. लॉकडाऊनमध्ये पोफळे कुटुंबीयांनी चक्क विहिर खोदली आणि पाणी टंचाईवर मात केली. त्यामुळे त्यांचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.
मोकळ्या वेळेत काय करावे या प्रश्नातून सूचला विहीर खोदण्याचा विचार
मालेगाव तालुक्यातील जामखेड येथील रामदास पोफळे कोरोनामुळे काम-धंदा नसल्याने गुजरातहून गावाकडे परत आले. कोरोनामुळे कडक निर्बंधात घरी वेळ जात नव्हता. त्यामुळे आता काय करावे? असा प्रश्न त्यांना पडला. मात्र गावात पाणी टंचाई असल्याने घरी विहीर खोदावी का? असा विचार त्यांच्या मनात आला. यावर त्यांनी पत्नी आम्रपालीसोबत चर्चाही केली. अखेर दोघांचीही या विचारावर सहमती झाली आणि दोघेही विहीर खोदण्याच्या कामाला लगले.
पोफळे दाम्पत्याच्या कष्टाला फळ
कोरोना काळ अनेकांना धडा शिकवून गेला. तर या काळात अनेकांनी आयुष्याचे चढ-उतार पाहिले. काही लोक खचून गेले, तर अनेकांनी चांगले कामही केले. अशीच काही सकारात्मक उर्जा देणारे काम मालेगाव तालुक्यातील जामखेड गावातील रामदास पोफळे आणि त्यांच्या पत्नीने केले. या दाम्पत्याने लॉकडाऊनच्या काळात २५ दिवसात २० फूट खोल विहीर खोदली. विशेष म्हणजे त्यांच्या कष्टाला फळ आले. त्यांनी खोदलेल्या विहिरीला पाणीही लागले आहे.