वाशिम - जिल्ह्यातील कारंजा लाड येथे औषधीचा अवैध पद्धतीने साठा ठेवणे तसेच संशयास्पद वैद्यकीय पदवी प्रकरणी रुग्ण कल्याण समितीने दि. २४ मे रोजी कारंजा येथील एका खासगी डॉक्टराच्या दवाखान्यात छापा टाकला. यावेळी २५ लाखांचा अवैध औषधी साठा जप्त करण्यात आला. या कारवाईमुळे वैद्यकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली.
अधिकार नसताना गैरकायदेशीरपणे कामकाज -
कोरोनाकाळात कोविड रुग्णालयाची परवानगी नसतानाही काही जण रुग्णांवर उपचार करीत असल्याच्या तक्रारी जिल्हा प्रशासनाला प्राप्त होत आहेत. या अनुषंगाने शोध मोहिम राबविण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने दिलेल्या होत्या. कारंजा येथील शोएब एम. खान सिद्दीकी यांचे रौशन क्लिनिक, गवळीपूरा येथे रुग्ण कल्याण समिती अध्यक्ष तथा गटविकास अधिकारी कालिदास तापी, तालुका वैद्यकीय अधिकारी किरण जाधव, वैद्यकीय अधीक्षक भाऊसाहेब लहाने, डॉ. किरण वाघमारे, नायब तहसीलदार विलास जाधव यांच्यासह चमूतील सदस्य व पोलीस कर्मचाऱ्यांनी पाहणी केली. यावेळी दोन रुग्णांना सलाईन सुरू असल्याचे दिसून आले. डॉक्टरांना पदवीबाबत विचारणा केली असता, खात्रीदायक पदवी व कोणतेही नूतनीकरण केलेले प्रमाणपत्र दाखविले नाही. त्यामुळे रुग्णांना भरती करण्याचा, अॅलोपॅथिक औषधी देण्याचा, औषधाचा साठा करण्याचा अधिकार नसताना गैरकायदेशीरपणे त्यांच्यावर उपचार केल्याचे आढळून आले. काही कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार केल्याचेही प्रथमदर्शनी निदर्शनास आले.