वाशिम - कोरोनाच्या संकटामुळे सर्वत्र टाळेबंदी करण्यात आल्याने, रोजगाराच्या शोधात महानगरात गेलेला ग्रामीण भागातील मजूर वर्ग आपापल्या गावी परतला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून या सर्वांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. बऱ्याच ठिकाणी या स्थलांतरित मजुरांमुळे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. मात्र वाशिम जिल्ह्यात विलगीकरणात असलेल्या या कष्टकऱ्यांकडून त्यांना ठेवण्यात आलेल्या शाळेच्या इमारतीच्या डागडुजीसह सुशोभिकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे.
पार्डी टकमोर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत ठेवण्यात आलेल्या या कष्टकऱ्यांकडून एक स्तुत्य उपक्रम हाती घेण्यात आला आहे. आपणाकडे असलेल्या वेळेचा सदुपयोग व्हावा म्हणून त्यांना ठेवण्यात आलेल्या शाळा, इमारत व परिसराची स्वच्छता हे मजूर करत आहेत.