वाशिम -कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या नागरिकांना महात्मा फुले जन आरोग्य योजना सरकारने लागू केली आहे. मात्र, वाशिम जिल्ह्यात ही लागू नसल्याने शेतकरी, शेतमजूर तसेच गोरगरीब जनतेला याचा लाभ मिळत नसल्याने जिल्ह्यातील जनतेवर अन्याय होत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना रुग्णांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ मिळावा यासाठी समाजसेवक सुभाष देवढे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल केली आहे.
शेतकरी, कोरोनाग्रस्तांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ मिळावा यासाठी जनहित याचिका दाखल - वाशिम कोरोना अपडेट
शेतकरी शेतमजूर कोरोना ग्रस्तांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ मिळावा यासाठी हायकोर्टात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर येत्या दोन तारखेला सुनावणी होणार आहे.
योजनेचा लाभ मिळावा म्हणून नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल -
कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव बघता सर्वसामान्य जनतेला ही खासगी कोविड सेंटरमध्ये उपचार घ्यावे लागले. यामध्ये सरकारी कर्मचारी अधिकाऱ्यांना शासकीय बिल मिळाले तर, व्यापारी, धनदांडगे याना विमाकवच मिळाले. मात्र, शेतकरी, शेतमजूरासह सर्वसामान्य जनतेला मात्र कोणताच लाभ मिळाला नाही.सरकारने कोरोना या रोगासाठी महात्मा फुले जन आरोग्य योजना लागू केली असून, रुग्णांना दीड लाखापर्यंत लाभ देण्याची घोषणा केली. दरम्यान मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने यासंदर्भात निकाल ही दिला आहे. मात्र, वाशिम जिल्हा प्रशासन जिल्ह्यातील रुग्णांना हे लागू नसल्याचे सांगत असल्याने, या वंचित रुग्णांना या योजनेचा लाभ मिळावा म्हणून नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल केली असून, येत्या दोन तारखेला त्यावर सुनावणी होणार असल्याचे याचिका कर्ते सुभाष देवढे यांनी सांगितले.