महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अरक गावात 'स्त्री' शक्तीचा सन्मान, दहा वर्षांपासून जोपासली जाते 'ही' परंपरा - arak

जगदेश्वर मंदिर संस्थान गावातील प्रत्येक मुलीला चोळीचे कापड आणि माहेरची शिदोरी देऊन सन्मान करतात. या कार्यक्रमात माहेरपणाला आलेल्या सर्व लेकी सहभाग घेतात. त्यांची साडीचोळी देऊन ओटी भरण्यात येते. दिवाळी सारख्या सणालाही माहेरी न येणाऱ्या अनेक माहेरवासिणी गावाच्या यात्रेला मात्र न चुकता येत असतात.

arak
अरक गावात स्त्री शक्तीचा सन्मान, गेल्या दहा वर्षांपासून जोपासली जाते 'ही' परंपरा

By

Published : Feb 23, 2020, 6:53 PM IST

Updated : Feb 23, 2020, 8:05 PM IST

वाशिम - एकीकडे स्त्री भ्रूण हत्येच्या दूषकृत्याने स्त्री-पुरुष गुणोत्तरामध्ये असमतोलाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असतानाच जिल्ह्यातील अरक या गावी मात्र, दरवर्षी नित्य नियमाने सार्वजनिक स्वरुपात नारी शक्तीचा सन्मान करण्यात येतो. येथील जगदेश्वराच्या वार्षिक यात्रेदरम्यान ग्रामस्थ सर्वधर्मीयांच्या लेकीबाळींना आमंत्रित करून त्यांची यथासांग बोळवण करतात. गेल्या अनेक वर्षांपासून हा उपक्रम अरकवासीय राबवत आहेत. सासरी गेलेल्या गावातल्या लेकी या कार्यक्रमात आवर्जून हजेरी लावतात.

अरक गावात 'स्त्री' शक्तीचा सन्मान, दहा वर्षांपासून जोपासली जाते 'ही' परंपरा

मंगरुळपीर तालुक्यातील अरक येथे महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी मोठी यात्रा भरवण्यात येते. या गावात अठरापगड जातींचे लोक राहतात. या सर्व गावकऱ्यांना एक सुत्रात बांधले आहे जगदेश्वर या ग्रामदेवतेने. हे मंदिर संस्थान गावातील प्रत्येक मुलीला चोळीचा कापड आणि माहेरची शिदोरी देऊन सन्मान करतात. या कार्यक्रमात माहेरपणाला आलेल्या सर्व लेकी सहभाग घेतात. त्यांची साडीचोळी देऊन ओटी भरण्यात येते. दिवाळी सारख्या सणालाही माहेरी न येणाऱ्या अनेक माहेरवासिणी गावाच्या यात्रेला मात्र न चुकता येत असतात.

हेही वाचा -'चंद्रकांत पाटलांना माझ्यावर पीएचडी करायला 12 वर्षे लागतील'

या कार्यक्रमासाठी गावाच्या जावयांनाही आग्रहाचे निमंत्रण असते. गावातील लेकींइतकाच जावायांचाही सन्मान केला जातो. प्रत्येक जावयाचाही शाल-श्रीफळ देवून सत्कार केला जातो. या सर्व कामांसाठी लोकवर्गणी गोळा केली जाते.

गावकऱ्यांनी श्रमदानातून जगदेश्वर मंदिराची उभारणी केली. या मंदिर परिसरात महाशिवरात्रीनिमित्त यात्रा भरवण्यात येते. या दोन दिवसांच्या काळात गावातील वर्षभराचे तंटे सामंजस्याने मिटवले जातात. या उपक्रमामुळे नवविवाहित मुलींचे क्षुल्लक कारणांनी सासरच्या मंडळींसोबत होणारे वाद कमी झाले असून घटस्फोटाचे प्रमाणही घटल्याचे ग्रामस्थ सांगतात.

Last Updated : Feb 23, 2020, 8:05 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details