वाशिम - येथील शेतकरी नंदकिशोर उल्हामाले यांनी त्यांच्या २ एकर शेतात लावलेल्या डाळिंबाच्या बागेतील संपूर्ण झाडे जेसीबी मशिनने उपटून फेकून दिली. अतिवृष्टीमुळे डाळिंबाच्या बागेचे झालेले नुकसान पाहता त्यांनी संपूर्ण बागेतील झाडे उपटून टाकण्याचा निर्णय घेतला.
शेतीत नवनवीन प्रयोग यशस्वी करणारे तसेच राज्य शासनाचा कृषी पुरस्कार प्राप्त शेतकरी नंदकिशोर उल्हामाले यांनी आपल्या २ एकर शेतात डाळिंब बाग तयार करून नवीन प्रयोग करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, विदर्भात डाळिंब बागेसाठी पोषक वातावरण नसून, उत्पादन खर्चही निघत नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. तसेच नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे झालेले बागेचे नुकसान पाहता त्यांनी संपूर्ण बागेतील झाडे जेसीबी मशीनने उपटून टाकली.