वाशिम- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात संचारबंदी लागू केली असून, जिल्ह्याच्या सीमाही बंद केल्या आहेत. त्यामुळे कामानिमित्ताने महानगरामध्ये रोजगाराच्या शोधात गेलेले नागरिक सीमाबंदी आणि वाहतुकीवर निर्बंध आल्याने अडकून पडले आहेत. मात्र घर जवळ करण्यासाठी नागरिक वेगवेगळी शक्कल शोधत असल्याचा प्रकार उघड झाला आहे.
संचारबंदीत आयडीयाची कल्पना; गावाकडे जाण्यासाठी चक्क अँम्बुलन्सचा वापर, पोलिसांनी केला 'भांडाफोड' - जिल्हा पोलिस अधीक्षक
अनसिंग येथील काही तरुण औरंगाबाद येथे कामासाठी गेले होते. मात्र संचारबदीत ते औरंगाबाद येथेच अडकून पडले होते. त्यामुळे त्यांनी घरी परतण्यासाठी शक्कल लढवली. मात्र अनसिंग पोलिसांनी त्यांना पकडून समज देत परत पाठवले.
तरुणांनी गावाकडे जाण्यासाठी चक्क रुग्णवाहिकेचा वापर केल्याचा अनसिंग पोलिसांनी पर्दाफाश केला. या रुग्णवाहिकेमधून रुग्ण नाही, तर प्रवासी पोलिसांच्या हातात सापडले आहेत. यामधील 10 प्रवासी औरंगाबादवरुन माहूरला जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
अनसिंग पोलिसांनी त्यांना समज देत आलेल्या मार्गाने पुन्हा परत पाठविले आहे. रुग्णवाहिकेतून 10 प्रवास करीत असल्याने हे घातक आहे. त्यामुळे असा प्रवास करणे टाळा आणि आपल्याबरोबर दुसऱ्याचा जीव धोक्यात घालू नका, असे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक वसंत परदेशी यांनी केले आहे.