वाशिम - जिल्ह्याची निर्मिती होऊन 21 वर्षे उलटली. मात्र, पांगरी महादेव गावाला ग्रामपंचायतच मिळाली नाही. त्यामुळे गावात विकासकामे होत नाहीत. गावाला ग्रामपंचायतचा दर्जा द्या किंवा गट ग्रामपंचायतला जोडा, अशी मागणी देखील केली. मात्र, प्रशासनाने लक्ष दिले नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचे ठरवले आहे.
अकोला जिल्ह्यातून विभाजन होऊन 1998 ला वाशिम जिल्ह्याची निर्मिती झाली. पांगरी महादेव हे बार्शीटाकळी तालुक्यात होते. मात्र, विभाजन झाल्यानंतर मंगरुळपीर तालुक्याला जोडले गेले. पांगरी महादेव गावाला मंगरुळपीर तालुक्यात जोडल्या गेले. मात्र, तेव्हापासून गावात ग्रामपंचायत अस्तित्वात आली नाही. ग्रामस्थांना ग्रामपंचायतीचा दाखला मिळत नाही. त्यामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. विद्यार्थ्यांना देखील शिक्षण घेताना अनेक अडचण येतात.