वर्धा -प्रत्येक जण आपल्या चिमूकल्याला तळहातावरील फोडाप्रमाणे जपत असतो. मात्र वर्ध्यात आपल्या चुमुकल्या मुलाला आणि मुलीला अमानुष मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणातील चिमुकल्याच्या अंगावरील व्रण पाहून कोणाचाही थरकाप उडेल. स्वतःच्या मुलांना मारहाण करणाऱ्या या दाम्पत्याला बालकल्याण विभागाच्या पुढाकारातून पोलिसांनी अटक केली आहे.
अंगावरील जखमा सांगत होत्या अमानुष पणाची कहाणी -
दोन दिवसांपूर्वी चाईल्डलाईनच्या 1098 हेल्पलाईनवर लहान बहिण भावांचा वडील आणि सावत्र आईकडून छळ होत असल्याची तक्रार प्राप्त झाली. त्यावरून चाईल्डलाईनच्या चमूने आर्वी तालुक्यातील ते गाव गाठून चौकशी सुरू केली. जेव्हा चमू गावात पोहचला तेव्हा जे वास्तव पुढे आले ते फारच धक्कादायक होते. यावेळी 8 वर्षाचा मुलगा आणि 10 वर्षाची मुलगी एका झाडाजवळ बसून होते. चाईल्डलाईनच्या पथकाने दोघांनाही विश्वासात घेऊन विचारपूस केली. तेव्हा या चिमुकल्यानी घटनाक्रम सांगितला. मुलांच्या अंगावर अनेक जखमाअसून त्या या अमानुष मारहाणीची कहाणी सांगत होत्या. दरम्यान चाईल्डलाईनचे जिल्हा समनवयक आशिष मोडक यांनी मुलांना ताब्यात घेऊन त्यांच्या पालकांवर कारवाई सुरू केली. त्यांनी आई वडीलांपासून मुलांची मुक्तता करत पुलगाव पोलीस स्टेशन गाठले. संबंधिताविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली.