महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कामरगावजवळ रस्त्यावरील मातीच्या ढिगार्‍याहून बस घसरल्याने अपघात; दोघांचा मृत्यू, पाच गंभीर - washim latest news

औरंगाबादवरून नागपूरला जाणाऱ्या खासगी बसचा कारंजा तालुक्यातील कामरगावजवळ आज (मंगळवार) सकाळी भीषण अपघात झाला.

bus accident
कारंजा तालुक्यातील कामरगावजवळ खासगी बसचा अपघात

By

Published : Sep 29, 2020, 6:15 PM IST

वाशिम - मातीच्या ढिगार्‍याहून खासगी बस घसरल्याने पलटी होऊन त्याखाली दबून एकाचा जागीच मृत्यू झाला, तर त्यामागून येणारी दुचाकीही त्याच मातीच्या ढिगाऱयावरून घसरल्याने घडलेल्या अपघातात आणखी एक जण जागीच ठार झाला. ही घटना आज सकाळी कारंजा-अमरावती मार्गावरील टाकळी फाट्याजवळ घडली.

कारंजा तालुक्यातील कामरगावजवळ खासगी बसचा अपघात

मिळालेल्या माहितीनुसार, एमएच 28 ई एल 4100 या क्रमांकाची लक्झरी बस औरंगाबादवरून नागपूरकडे जात होती. यावेळी मार्गातील टाकळी फाट्याजवळ रस्त्याच्या मधोमध कंत्राटदाराने टाकलेल्या मातीच्या ढिगाऱ्यावरून बस घसरली व रस्त्याच्या कडेला पलटी झाली. यात अमोल जोगेश खंडारे (वय 21, रा. नागपूर) हा बसखाली दबल्याने जागीच ठार झाला. तर, चेतना रमेश भगत, प्रशांत चैनलाल काळे, संदिप विनोद टेकाम, सीमा नितीन गवई व चेतना नितीन गवई असे पाचजण गंभीर जखमी झाले.

या घटनेनंतर काही क्षणातच एमएच 27 एटी 5703 या क्रमांकाची दुचाकी याच मार्गाने याच ठिकाणी आली. यावेळी त्या मातीच्या ढिगाऱयावरून ती घसरली. यात दुचाकीवरील मागे बसलेल्या प्रभाकर चंद्रभान वाघ (वय 50 वर्ष रा. शेंदुरजुना खु. ता. धामनगाव) यांचा दुचाकीवरून खाली पडल्याने जागीच मृत्यू झाला. या दुचाकीवरील दोघेजण पंढरपूरहून अमरावतीकडे जात होते.

मागील काही दिवसांपासून कारंजा - अमरावती मार्गाच्या रूंदीकरणाचे व कॉंक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. हे काम करताना संबंधीत कंत्राटदाराने रस्त्याच्या मधोमध मातीचा ढिगारा टाकल्याने हे दोन्ही अपघात घडले आहेत. तसेच सदर ठिकाणी कोणत्याही प्रकारचे सूचना फलक लावण्यात आले नाही. यापूर्वी देखील याच मार्गावर कंत्राटदाराच्या चुकीमुळे झालेल्या अपघातात आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला आहे.

एकीकडे रस्ते विकास महामंडळाच्यावतीने प्रवाशांच्या सोयीसाठी रस्ते बनवले जात आहेत. तर, दुसरीकडे याच रस्त्यांसाठी कंत्राटदाराच्या चुकीमुळे सर्वसामान्यांचा बळी जात आहे. त्यामुळे संबंधीत कंत्राटदारांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच धनज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनेची नोंद घेतली. तसेच जखमींना प्राथमिक उपचारासाठी कामरगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. घटनेचा अधिक तपास धनज पोलीस करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details