वाशिम - जिल्ह्यात सन २०२०-२१ खरीप हंगामसाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू करण्यात आली आहे. ३१ जुलै ही विमा हप्ता सादर करण्याची अंतिम मुदत असून, कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ही योजना ऐच्छिक आहे. कर्जदार शेतकऱ्यांसोबतच बिगर कर्जदार शेतकऱ्यालाही बँकेत विमा हप्ता भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी केले आहे.
सोयाबीन, कापूस, तूर, मुग, उडीद व खरीप ज्वारी पिकाचा प्रधानमंत्री विमा पीक योजनेत समावेश असून, जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील सर्व मंडळांना ही योजना लागू आहे. तसेच अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पीक घेणारे कुळाने अगर भाडेपट्ट्याने जमीन करणाऱ्या शेतकऱ्यांसह सर्व शेतकरी प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी पात्र आहेत. प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी विहित प्रपत्रात नजीकच्या सामुहिक सुविधा केंद्र, महा ई-सेवा केंद्र व बँकेकडे विमा हप्ता सादर करणे आवश्यक आहे.
बचत खाते असलेल्या बँकेतून विमा हप्ता भरता येणार
कर्जदार शेतकऱ्यांचा विमा प्रस्ताव संबधित बँकेमार्फत सादर करता येतो. मात्र, बिगर कर्जदार शेतकऱ्यांना सुद्धा बँकेमार्फत विमा हप्ता सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यानुसार विमा योजनेत सहभागी असलेले शेतकरी त्यांचे बचत खाते ज्या बँकेत आहे, त्या बँकेमध्ये आपला पीक विमा हप्ता ३१ जुलै २०२० पर्यंत सादर करू शकतील. गावांमध्ये महा ई-सेवा केंद्र, सामुहिक सुविधा केंद्र कार्यान्वित नसल्यास अथवा विमा पोर्टल बंद असल्यास शेतकऱ्यांना बँकेत विमा हप्ता सादर करता येणार आहे. मात्र, सदर बँकेत संबंधित शेतकऱ्याचे बचत खाते असणे बंधनकारक आहे.
सामुहिक सुविधा केंद्र रात्री १० वाजेपर्यंत सुरू
प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी विमा हप्ता सादर करण्याची अंतिम मुदत ३१ जुलै २०२० पर्यंत आहे. या योजनेपासून शेतकरी वंचित राहू नयेत, याकरिता जिल्ह्यातील सर्व महा ई-सेवा केंद्र, सामुहिक सुविधा केंद्र रात्री १० वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. याबाबतचे आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी यापूर्वीच निर्गमित केले आहेत.
प्रधानमंत्री पीक विमा योजनेतून गतवर्षी १४७ कोटी रुपयांची भरपाई