वाशिम - पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणानंतर राज्याचे वनमंत्री संजय राठोड हे माध्यमे आणि जनतेसमोर आले नाहीत. गुरुवारी वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे बंजारा समाजाच्या महंतांची याप्रकरणी महत्त्वा बैठक झाली. या बैठकीत संजय राठोड समोर केव्हा येणार याबाबत चर्चा होणार होती. मात्र, संजय राठोड यांच्या संदर्भात कोणताच निर्णय झाला नाही. संजय राठोड माध्यमांसमोर केव्हा बोलणार हे दोन दिवस अगोदर माध्यमांना कळवले जाईल, अशी माहिती महंत सुनील महाराज यांनी दिली.
संजय राठोड माध्यमांसमोर कधी येणार या संदर्भात निर्णय झाला नाही समाज राठोड यांच्या पाठीशी -
संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणातील वन मंत्री संजय राठोड हे, गुरुवारी बंजारा समाजाची काशी समजल्या जाणाऱ्या पोहरादेवी येथे येऊन आपली भूमिका स्पष्ट करतील अशी चर्चा होती. मात्र, याठिकाणी वनमंत्री आले नाही. त्याऐवजी बंजारा समाजातील महंतांची एक बैठक पार पडली. बंजारा समाज संजय राठोड यांच्या पाठीशी असून, पूजा चव्हाण यांच्या कुटुंबीयांनी कुठलाही आरोप केलेला नाही. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोणाच्या दबावात न येता निर्णय घ्यावा, अशी विनंती महंतांनी केली. तसेच संजय राठोड यांनी आपल्या कुटुंबासह येऊन पोहरादेवीचे दर्शन घ्यावे व येथील विकास कामांचा आढावा घ्यावा, असे आवाहनही महंतांनी केले आहे.
काय आहे पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण -
बीडच्या परळीमधील पूजा चव्हाण या २२ वर्षाच्या तरुणीचा रविवारी (७ फेब्रुवारी) पुणे येथे इमारतीच्या बाल्कनीतून पडून मृत्यू झाला. ही हत्या आहे की आत्महत्या याबाबत दुमत आहे. वन मंत्री संजय राठोड यांचा याप्रकरणाशी संबंध असल्याच्या चर्चा समाज माध्यमांमध्ये होत आहेत. याशिवाय विरोधी पक्षातील नेत्यांनी देखील राठोड यांना दोषी धरले आहे. या घटनेनंतर संपूर्ण राज्यातील राजकरण ढवळून निघाले आहे. या मुद्यावरून विरोधी भाजप आक्रमक झाला असून त्यांनी राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तरुणीचे काही कॉल रेकॉर्डिंग पोलिसांच्या हाती लागले आहेत. या प्रकरणात पोलिसांवर राजकीय दबाव असून पूजाच्या मोबाईल आणि लॅपटॉपमधील अनेक गोष्टी दडवण्याचा प्रयत्न होत असल्याचा संशय भाजपने व्यक्त केला आहे.