वाशिम - राज्यातील एक लाख 42 हजार कंपन्या बंद झाल्या आहेत, त्यामुळे लाखो तरुणांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. तरुणांमध्ये प्रचंड रोष आहे, असे असताना सरकार यात्रा काढून खोटे बोलत आहे, असे मत खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी व्यक्त केले. राष्ट्रवादी काँग्रेसची शिव स्वराज्य यात्रा आज वाशिम जिल्ह्यात पोहोचली आहे. त्यानिमित्त ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
वाढत्या बेरोजगारीने गुन्हेगारी वाढून समाजाचे स्वास्थ ढासळणार, याला सरकार जबाबदार - अमोल कोल्हे - वाशिम
राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा आज वाशिम येथे पोहोचली. यावेळी खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांची उपस्थिती होती.
सरकारच्या धोरणांमुळे महिला, युवक तसेच शेतकरीवर्ग अस्वस्थ असताना मुख्यमंत्री आणि शिवसेना राज्यात यात्रा काढत आहेत. पाच वर्ष सत्तेत असताना जर तुम्ही काम केले असते तर तुम्हाला यात्रा काढण्याची वेळ आली नसती, असे चित्र सामान्य नागरिकांच्या मनात निर्माण झाले आहे, असे खासदार कोल्हे म्हणाले.
राज्यात आणि देशात बेरोजगारी वाढत असून या बेरोजगारीचे पर्यावसन गुन्हेगारीत होणार आणि वाढत्या गुन्हेगारीचे पर्यावसन हे समाजव्यवस्था ढासळण्यात होणार आहे. त्यामुळे सरकारने आपली जबाबदारी ओळखून यावर पाऊल उचलण्याची गरज आहे. मात्र, असे न करता सरकार मतांचे राजकारण करण्यात व्यस्त आहे, अशी टीका खा. अमोल कोल्हे यांनी केली.