वाशिम - वाशिम रेल्वे स्थानकावरील पार्किंग कंत्राटदारांची दादागिरी वाढत असल्यामुळे सामान्य जनतेला याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या संदर्भात शिवसेना खासदार भावना गवळी यांनी दबंग स्टाईलमध्ये आपल्या कार्यकर्त्यांसमवेत याठिकाणी जाऊन रेल्वे अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.
रेल्वे स्थानकावर 'पार्किंग फी'च्या नावावर कत्रांटदार नागरिकांकडून पैसे मोजत असतात. याचा नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. तसेच पार्किंगच्या अनागोंदी कारभारात अधिकारी सामील असल्याचा आरोपही नागरिकांनी केला होता. याबाबत काही काळापूर्वी शिवसेना कार्यकर्त्यांचा पार्किंग चालक ठेकेदारांबरोबर वाद झाला होता. त्यामुळे खासदार भावना गवळी यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना धारेवर धरले. तसेच उद्यापासून(सोमवार) पार्किंग नियम बदलून एका तासापर्यंत कोणीही 'पार्किंग शुल्क' देऊ नये, असे आवाहन खासदार भावना गवळी यांनी वाहन धारकांना केले आहे.