वाशिम- मंगरुळपीर पोलिसांनी तऱ्हाळा येथील चेक पोस्टवर ४८ किलो चांदी जप्त केली आहे. निवडणूक काळात मंगरुळपीर पोलिसांची ही दुसरी कारवाई आहे. या घटनेनंतर चेक पोस्टवरील पोलीस व इतर विभागाचे कर्मचारी आता प्रत्येक वाहनांची कसून तपासणी करीत आहेत.
मंगरुळपीर तालुक्यातील तऱ्हाळा फाट्यावर चेकपोस्ट आहे. त्या चेकपोस्टवर रात्री साडे आठ वाजताच्या दरम्यान पोलीस व एकात्मिक बालविकास विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून वाहनांची तपासणी सुरू होती. त्यादरम्यान या टाटा झेस्ट (एम.एच २९ ए आर ५५६७) वाहनाची तपासणी करण्यात आली असता त्यामध्ये ४८ किलो चांदी आढळली. वाहन चालक चेतन गावंडे व मुद्देमाल मालक जिग्नेश जयंतीलाल हिंडोचा (रा.यवतमाळ) यांना विचारणा केली असता सदर चांदी ही यवतमाळ येथील व्यापाऱ्यांची असल्याचे समजले.