वाशिम -बाहेर जिल्ह्यात कामाला गेलेले मजूर आपल्या गावी परतल्यानंतर त्यांची वैद्यकीय तपासणी करून, त्यांना चक्क जंगला जवळ शेतात क्वारंटाईन केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. वाशिम जिल्ह्यातील वरदरी खुर्द येथील ग्रामपंचायतने हा प्रताप केला आहे. दरम्यान, 9 दिवसांपासून क्वारंटाईन असलेल्या या कुटुंबाना जीवनावश्यक वस्तू आणि पाण्याची कोणतीच व्यवस्था केली नाही. त्यामुळे या मजुरांवर उपासमारी वेळ आली आहे.
वरदरी खुर्द येथील 23 आदिवासी मजूर वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे हरभऱ्याच्या हंगामासाठी गेले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांना मजुरी मिळत नसल्याने त्यांनी वर्धा जिल्ह्यातून मुलाबाळासह सहा दिवस पायी प्रवास करून गाव गाठले. मात्र, गावातील नागरिकांनी त्यांना गावात येण्यास मनाई केली. त्यानंतर त्यांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना शाळेत किंवा सभामंडपात ठेवणे अपेक्षित होते. मात्र, ग्रामपंचायतचे सरपंच आणि पोलीस पाटील यांनी त्यांना एका जंगलालगत असलेल्या शेतात क्वारंटाईन केले. ज्या शेतात त्यांना ठेवले तिथे ना पाण्याची व्यवस्था, ना खाण्याची. त्यामुळे या कुटुंबावर उपाशी राहण्याची वेळ आली आहे.