वाशिम - मागील दोन दिवसांत वाशिम जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे सोनखास गावासह जिल्ह्यातील अनेक गावातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतात पाणी साचल्याने शेकडो एकर शेतीचे नुकसान झाले आहे. दरम्यान, सोयाबीन काढणीला आले आहे. मात्र, शेतात गुडघाभर पाणी साचलेले आहे. त्यामुळे सोयाबीनची काढणी कशी करावी असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. त्यातमध्येच हवामान खात्याने पुढील दोन दिवस पावसाचा इशारा दिल्यामुळे, पीक हातचे जाण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळे कृषी विभागाने नुकसान ग्रस्त भागाचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी अशी मागणी करण्यात येत आहे.
शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी
वाशिम जिल्ह्यातील सोनखास येथील शेतकरी यंदा सोयाबीनची पेरणी केली तेव्हापासून चांगली मशागत केल्यामुळे सोयाबीन पीक बहरात होते. मात्र, दोन दिवस झालेल्या पावसामुळे सोयाबीनच्या शेतात गुडघाभर पाणी असल्याने पीक हातचे जाण्याची वेळ आली आहे. त्यामुळे कृषी विभागाने नुकसानग्रस्त भागाचे सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी अशी मागणी शेतकरी करीत आहेत.