वाशिम - खासदार भावना गवळी यांच्या संस्थेच्या पार्टीकल बोर्ड कारखान्यात 100 कोटींचा भ्रष्टाचार झाला आहे. हा 55 कोटीचा कारखाना असताना केवळ 25 लाखात विकत घेतला आहे. त्यामुळे या कारखान्याच्या भ्रष्टाचाराची चौकशी करून पुढील दोन आठवड्यात कारवाई सुरू होणार असल्याचे भाजपा नेते किरीट सोमैया यांनी सांगितले. तर दुसरीकडे खासदार भावना गवळी यांनी सर्व आरोप फेटाळून टाकले असून भाजपा आमदार राजेंद्र पाटणी यांच्या घोटाळ्याची चौकशी ईडीकरून करण्याची मागणी केली आहे.
'शिवसेनेला घाबरत नाही'
भावना गवळी यांच्या ऑफिसमधून चोरी गेलेले सात कोटी रुपये आले कुठून असा सवाल उपस्थित आहे. या प्रकरणात मुख्यमंत्री, खासदार यांना पाठीशी घालत असल्याचा आरोपही यावेळी किरीट सोमैया यांनी केला. आज (शुक्रवार) पार्टीकल बोर्ड कारखाना पाहण्यासाठी गेले असता, तुमच्यावर दगडफेक झाली यासंदर्भात विचारले असता मी शिवसेनेला घाबरत नाही. अशा धमक्या मला रोजच येतात, असे किरीट सोमैया यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.
'भावना गवळीवर दोन आठवड्यात कारवाई'
खासदार भावना गवळी यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. यासाठी मी ईडी, सीबीआय, राज्यसरकार तसेच केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून खासदार यांच्यावर दोन आठवड्यात कारवाई सुरू करणार असल्याचे यावेळी पत्रकार परिषदेत सोमैया यांनी सांगितले.