वाशिम - कोरोनाच्या संकटामुळे राज्यभरातील शेतकरी अडचणीत आले आहेत. त्यातच वाशिम जिल्ह्यात सुरुवातीला चांगला पाऊस झाल्यानंतर पेरणी केलेल्या शेतकऱ्यांवर अतीपावसामुळे दुबार पेरणीचे संकट आले आहे. त्यामुळे दुबार पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांना ट्रॅक्टर मोफत देण्याचे काम दत्ता बयस या शेतकऱ्याने सुरू केले आहे. त्यामुळे नागठाणा येथील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
शेतकऱ्याचा दुबार पेरणीसाठी मोफत ट्रॅक्टर देण्याचा उपक्रम डिझेल टाका आणि पेरणी करा -
जून महिन्यात सहा आणि सात जूनला चांगला पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या. मात्र 17 तारखेला अतिपाऊस झाल्याने नागठाणा गावातील जवळपास 200 एकर शेतातील बियाणे उगवलेच नाही. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणी करण्याची वेळ आली आहे. आधीच जुळवाजुळव करून पेरणी केल्यामुळे दुबार पेरणीसाठी आर्थिक संकट आले. म्हणून दुबरापेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांना मोफत ट्रॅक्टर देण्याचे ठरवले. मात्र डिझेल दर वाढल्यामुळे डिझेल टाका आणि पेरणी करा असा उपक्रम चालू केला असल्याचे दत्ता बयस यांनी सांगितले.
रासायनिक खते आणि बियाण्यांबरोबर इंधन दरवाढ झाल्याने शेतकरी पुरता मेटाकुटीला आला आहे. त्यातच दुबार पेरणीचे संकट आल्यामुळे दत्ता बयस यांनी गावातील शेतकऱ्यांना फक्त डिझेल टाका आणि पेरणी करा असा उपक्रम सुरू केला आहे. त्यामुळे गावातील शेतकऱ्यांना मोठा आधार झाला आहे. दत्ता बयस प्रमाणे प्रत्येक गावात अशी शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांना मदत केल्यास मोठा दिलासा मिळेल यात मात्र शंका नाही.