वाशिम -कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेल्या भोयनी (ता. मानोरा) व दादगाव (ता. कारंजा) या 2 गावांना प्रतिबंधित क्षेत्र (कंटेन्मेंट झोन) घोषित करण्यात आले आहे. येथील नागरिक, शेतकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी या क्षेत्रात विशेष उपाययोजना राबवण्यात येणार आहेत. याकरिता प्रमाणित कार्यप्रणाली (एसओपी) निश्चित करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी 4 जूनला निर्गमित केले आहेत.
आगामी खरीप हंगाम लक्षात घेऊन प्रतिबंधित क्षेत्रातील शेतकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. दोन्ही गावांमधील शेतकऱ्यांना खरीपमध्ये पेरणीसाठी लागणारे बियाणे, खते त्यांच्या बांधावरच उपलब्ध करून द्यावे. तसेच शेती अवजारे व तत्सम कृषि विषयक खरेदीसाठी संबंधित तालुका कृषि अधिकारी नियोजन करून सदर साहित्य विकणाऱ्या आस्थापनाकडून साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करावा. प्रतिबंधित क्षेत्रातील पात्र शेतकऱ्यांना 20 जूनपर्यंत पीक कर्ज उपलब्ध करून देण्याची कार्यवाही सुद्धा बँक व तालुका कृषी अधिकारी यांनी करण्याबाबत सूचित करण्यात आले आहे.
आरोग्य विभागाने या दोन्ही गावांमध्ये अतिजोखमीचे आजार असलेले रुग्ण, गर्भवती महिला, क्षयरोग, कर्करोग, आयएलआय अथवा 'सारी'ची लक्षणे असलेल्या रुग्णांची तपासणी करावी. आवश्यकता असल्यास या रुग्णांना पुढील उपचारासाठी कोविड केअर सेंटरला आणावे. साथीच्या रोगांसंबंधी उपाययोजना सुद्धा तातडीने राबविल्या जाव्यात, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
पिण्याच्या पाण्याच्या सार्वजनिक स्त्रोतांचे निर्जंतुकीकरण करणे, तसेच आवश्यकतेनुसार ब्लिचिंग पावडरचा उपयोग, गावांमध्ये स्वच्छता राखणे यांसारख्या जबाबदाऱ्या संबंधित गट विकास अधिकारी, ग्रामसेवक यांच्यावर सोपविण्यात आली आहे. संबंधित गावांच्या ग्रामसेवक व तलाठी यांनी गावांमधील आजारी व्यक्तींना आवश्यकतेप्रमाणे औषधे उपलब्ध करून देणे, तसेच अत्यावश्यक सेवा, वस्तू गावकऱ्यांना उपलब्ध करून देण्यासाठी स्वयंसेवकांची नेमणूक करण्याबाबत प्रयत्न करावेत. तसेच जून महिन्याचे स्वस्त धान्य दुकानांतील धान्यही स्वयंसेवकांमार्फत घरपोच करण्याचे नियोजन संबंधित तहसीलदार यांनी करावे. प्रतिबंधित क्षेत्रात केवळ अत्यावश्यक सेवा, आस्थापना सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुरू राहतील, असे मोडक यांनी निश्चित केलेल्या ‘एसओपी’मध्ये नमूद करण्यात आले आहे.
शेतीतील कामांसाठी मुभा-
प्रतिबंधित क्षेत्र जाहीर केल्यामुळे भोयनी व दादगाव येथे बाहेरील व्यक्तींना जाण्यास तसेच या दोन्ही गावांमधील व्यक्तींना गावाबाहेर पडण्यास मनाई राहणार आहे. मात्र, 10 जून पासून येथील शेतकऱ्यांना आपल्या शेतात जाण्यासाठी पायी, दुचाकी वाहनाने अथवा बैलगाडी घेवून गावाबाहेर जाण्यास परवानगी दिली जाणार आहे. या शेतकऱ्यांनी घरातून थेट शेतात जाणे तसेच योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक आहे. अत्यावश्यक सेवा वगळून इतर कोणत्याही ठिकाणी अथवा दुसऱ्या गावांमध्ये जाण्यास येथील नागरिकांना मनाई राहणार आहे. अत्यावश्यक सेवा वगळता प्रतिबंधित क्षेत्रात शासकीय कामासाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांव्यतिरिक्त अन्य कोणत्याही चारचाकी वाहनांना प्रवेश राहणार नाही. तसेच प्रतिबंधित क्षेत्रातूनही चारचाकी वाहनांना बाहेर पडता येणार आही. संबंधित उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्यामार्फत याबाबतची कार्यवाही केली जाणार असल्याचे ‘एसओपी’मध्ये नमूद करण्यात आले आहे.