वाशिम - राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग वेगाने वाढत आहे. या विषाणूचा संसर्ग झालेला एकही रुग्ण वाशिम जिल्ह्यात नाही. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांचा कोरोना विषाणूच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून वाशिम जिल्ह्याच्या सर्व सीमा तत्काळ बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी ऋषीकेश मोडक यांनी दिले आहेत. जिल्ह्याची रहिवासी नसलेल्या कोणत्याही व्यक्तीला अत्यावश्यक कारणांशिवाय प्रवेश दिला जाणार नाही. तसेच जिल्ह्यातील नागरिकांनाही जिल्ह्याबाहेर जाण्यास मनाई करण्यात आली आहे. पुढील आदेशापर्यंत सीमा बंदी कायम राहणार आहेत.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यातील किराणा, अन्नधान्य, फळे व भाजीपाला, दुध, औषधे, दूरसंचार, विद्युत, पिण्याचे पाणी विक्री करणारी दुकाने, बँक व पेट्रोलपंप आदी जीवनावश्यक सेवा वगळता संपूर्ण वाशिम जिल्ह्यातील इतर सर्व दुकाने १०० टक्के बंद राहतील. जिल्ह्यातील सर्व धार्मिक स्थळे भाविकांसाठी बंद राहतील. आवश्यकता नसेल तर नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आदेश देण्यात आले आहेत.