वाशिम - कारंजा लाड शहराच्या ऐतिहासिक संपन्नतेची साक्ष देणाच्या चारही मुघलकालीन वेशी आता अखेरच्या घटका मोजत आहेत. कधी काळी शहराची सुरक्षा करणाऱ्या याच वेशी सद्यस्थितीत शहरातील नागरिकांच्या जीवासाठी धोकादायक बनल्या आहेत.
ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या कारंजा शहराच्या चारही दिशेला टोकाच्या ठिकाणी पोहा वेश, दारव्हा वेश, दिल्ली वेश आणि मंगरुळ वेश अशा चार वेशी आहेत. त्यापैकी एका वेशीच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाले आहे. दुसऱ्या एका वेशीच्या दुरुस्तीचे काम संथगतीने सुरू आहे. परंतु, उर्वरित दोन वेशींच्या दुरुस्तीचे काम अद्यापही हाती घेण्यात आलेले नाही. हा ऐतिहासिक ठेवा जपण्यासाठी शासनस्तरावर कोणतेही विशेष प्रयत्न केले जात नाहीत, ही मोठी खेदाची बाब आहे. कारंजा शहराला मोठा वैभवशाली इतिहास असून शहरातील प्राचीन वास्तू त्याची साक्ष देत उभ्या आहेत.