वाशिम -वाशिम जिल्ह्यातील कारंजा, मंगरुळपीर तालुक्यासह ग्रामीण भागात जोरदार पाऊस झाला. वादळी वाऱ्यासह जोरदार पावसामुळे मंगरुळपीर तालुक्यातील मोहरी ते गिंभा परिसरातील घरांवरील टीनपत्रे उडाले. तर एमएसईबीच्या मोठ्या लाईनचे 4 टावर जमीनदोस्त झाले आहेत. शिवाय झाडेही कोसळली आहेत.
बागा, भाजीपाल्यांचे नुकसान; दर कडाडणार
गेल्या तीन दिवसांपासून या भागात कमालीची उष्णता जाणवत आहे. काल (27 मे) सायंकाळी वातावरणात बदल झाला. आकाशात ढग जमू लागले आणि पावसाला सुरूवात झाली. सोसाट्याचा वारा असल्याने काही घरांवरील टीनपत्रे उडाले. या पावसामुळे लगतच्या भागातील आंबे, लिंबू, केळीच्या बागांचे नुकसान झाले. भाजीपाल्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे बाजारात भाज्या कमी प्रमाणात येणार आहेत. परिणामी भाव कडाडण्याची शक्यता नाकारता येत नाही.