वाशिम- शहरातील नागरिकांना रानभाज्याचा आस्वाद मिळावा यासाठी राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे यांच्या संकल्पनेतून राज्यात रानभाजी महोत्सव सुरू करण्यात आला. आज पालकमंत्री शंभूराजे देसाई यांच्या हस्ते रानभाजी महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. या रानभाजी महोत्सवात जिल्ह्यातील शेतकरी गट, महिला बचत गट मिळून 48 गटांनी सहभाग नोंदवला असून 53 प्रकारच्या रानभाज्या महोत्सवात ठेवण्यात आल्या आहेत. दरम्यान, रानभाज्या 100 टक्के विषमुक्त असल्याने शहरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात भाज्या खरेदी करण्यासाठी गर्दी केली.
शेतमालाची खरेदी-विक्री नियमित सुरू राहण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समित्या सुरू होत्या. या काळात शासकीय आधारभूत किंमतीने १ लक्ष ९ हजार क्विंटल तूर आणि ८६ हजार ७५७ क्विंटल चना खरेदी करण्यात आला. जिल्ह्यात यंदा शासकीय खरेदी केंद्रांवर विक्रमी २ लक्ष ६९ हजार ७०५ क्विंटल कापसाची खरेदी झाली. त्यापोटी शेतकऱ्यांना सुमारे १३६ कोटी ६ लक्ष रुपयांचे चुकारे अदा करण्यात आले. त्यामुळे लॉक डाऊन कालावधीमध्ये शेतकऱ्यांना मोठा आधार मिळाल्याचे पालकमंत्री देसाई यावेळी म्हणाले.
शेतकऱ्यांना आर्थिक विवंचनेतून बाहेर काढण्यासाठी कर्जमुक्ती -
नैसर्गिक आपत्ती व इतर कारणांमुळे कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक विवंचनेतून बाहेर काढण्याठी राज्य शासनाने महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली. या योजनेतून आतापर्यंत जिल्ह्यातील ८३ हजार २१३ शेतकऱ्यांना ५३४ कोटी ८७ लाख रुपयांची कर्जमुक्ती मिळाली आहे. गतवर्षी परतीच्या पावसामुळे पिकांचे नुकसान झाले होते. या नुकसान भरपाईपोटी प्रधानमंत्री पीक विमा योजना आणि नैसर्गिक आपत्ती विभागाकडून एकूण ३५३ कोटी ६३ लक्ष रुपयांची मदत थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली आहे. खरीप हंगामात शेतकरी बांधवांना पतपुरवठा सुरळीत ठेवण्याचे निर्देश आले होते. त्यानुसार ८६ हजार ७१८ शेतकऱ्यांना ६१७ कोटी ६० लक्ष रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले. गतवर्षीच्या तुलनेत यंदा जवळपास दुप्पट शेतकऱ्यांना पीक कर्ज वितरण झाले आहे, असेही पालकमंत्री देसाई यांनी सांगितले.
वाशिम येथे बाळासाहेब ठाकरे शेतकरी प्रशिक्षण केंद्र उभारणार -
शेतीतील उत्पन्न वाढीसाठी शेतकऱ्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देणे काळाची गरज आहे. याकरिता वाशिम येथे दिवंंगत बाळासाहेब ठाकरे शेतकरी प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार आहे. या साठी जिल्हा नियोजन समितीमधून २ कोटी ५० लक्ष रुपये निधी मंजूर केला आहे. तसेच जिल्ह्यात ८ शेतकरी चेतना केंद्रांसाठी सुद्धा २ कोटी ४० लक्ष रुपये मंजूर केले आहेत. पहिल्या टप्प्यात १ कोटी ६० लक्ष रुपये कृषि विभागास उपलब्ध करून दिले आहेत, असे पालकमंत्री देसाई यांनी सांगितले. पोहरादेवी विकास आराखड्याची कामे गतीने सुरु आहेत. मार्च २०२० अखेरपर्यंत ११ कोटींची कामे पूर्ण झाली आहेत. या कामांसाठी शासनाने नुकताच ७ कोटी ५० लक्ष रुपये निधी उपलब्ध करून दिला असल्याचे ते म्हणाले.
दुर्मिळ भाज्यांची मेजवानी: पालकमंत्री शंभूराजे देसाईंंच्या हस्ते रानभाजी महोत्सवाचे उद्घाटन - ranbhaji mahotsav in washim
पालकमंत्री शंभूराजे देसाई यांच्या हस्ते रानभाजी महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. या राणभाजी महोत्सवात जिल्ह्यातील शेतकरी गट, महिला बचत गटांनी सहभाग नोंदवला.
ग्रामीण रस्त्यांसाठी यंदा भरीव तरतूद -
जिल्ह्यातील ग्रामीण रस्त्यांच्या दर्जा सुधारण्यासाठी यावर्षी जिल्हा वार्षिक योजनेमध्ये भरीव तरतूद करण्यात आली आहे. ग्रामीण रस्ते विकास व मजबुतीकरणासाठी गेल्या चार वर्षात मिळून १४ कोटी रुपये तरतूद करण्यात आली होती. मात्र यंदा एकाच वर्षात १२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे इतर जिल्हा रस्ते विकास व मजबुतीकरणासाठी गेल्या चार वर्षात मिळून १२ कोटी रुपये तरतूद करण्यात आली होती. मात्र यंदा एकाच वर्षात ११ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याचे पालकमंत्री देसाई यांनी यावेळी सांगितले.
सर्वांना सोबत घेऊन जिल्ह्याच्या विकासासाठी प्रयत्न करणार -
कोरोनाच्या संकटातून जिल्ह्याला बाहेर काढून विकास कामांना गती द्यायची आहे. याकरिता जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी, प्रशासन यांना सोबत घेवून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणार असल्याचे पालकमंत्री देसाई यांनी सांगितले. तसेच सध्या जिल्ह्यातील कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सर्वांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्याबरोबरच आपल्यापासून इतरांना संसर्ग होणार नाही, याबाबत दक्ष राहावे. आपण सर्वजण सांघिकपणे प्रयत्न करून या संकटावर नक्कीच मात करू, असा ठाम विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
TAGGED:
ranbhaji mahotsav in washim