वाशिम - मालेगाव तालुक्यातील जऊळका आणि शिरपूर जैन प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये 'आरटीपीसीआर'च्या चाचणीसाठी घेण्यात आलेले घशातील स्त्रावाचे नमुने जास्त दिवस पडून असल्याने त्या नमुन्यांमध्ये बुरशी तयार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
मालेगाव तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयातील कर्मचारी हे, शिरपूर जैन आणि जऊळका प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये २४ फेब्रुवारीपासून आरटीपीसीआर चाचणीसाठी घेतलेले नमूने आणि मालेगाव केंद्रातील नमुने असे एकूण ३१० नमुने वाशिम येथील कोविड प्रयोगशाळेत, १ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता घेऊन गेले होते. त्या ३१० नमुन्यांपैकी २०० नमुने प्रयोगशाळेच्या अधिकाऱ्यांनी स्वीकारले. मात्र उर्वरित ११० नमुन्यांमध्ये बुरशी तयार झाल्याने हे नमुने लॅबच्या अधिकाऱ्यांनी स्वीकारण्यास नकार दिला.