वाशिम -वनमंत्री संजय राठोड आणि पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी पोहरादेवी येथे 11 लोकांची पंचायत आज दुपारी 2 वाजता होणार आहे. यामध्ये चार महंत, इतर सात सामाजिक संघटनांच्या नेत्यांचा समावेश आहे. या पंचायती नंतरच वनमंत्री संजय राठोड पोहरादेवी येथे कधी येणार याबद्दल स्पष्ट होणार आहे.
पोहरादेवी येथे चार महंत आज पंचायत घेणार बीडमधील पूजा चव्हाण या तरुणीने काही दिवसांपूर्वी आत्महत्या केली. या प्रकरणात शिवसेनेचे नेते आणि वनमंत्री संजय राठोड यांचे नाव समोर येत आहे. गुरुवारी पोहरादेवी येथे राठोड प्रसार माध्यमांसमोर बोलणार असल्याचे सांगितले होते. मात्र, काही कारणास्तव ते उपस्थित राहू शकले नाहीत.
काय आहे पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण -
बीडच्या परळीमधील पूजा चव्हाण या २२ वर्षाच्या तरुणीचा रविवारी (७ फेब्रुवारी) पुणे येथे इमारतीच्या बाल्कनीतून पडून मृत्यू झाला. ही हत्या आहे की आत्महत्या याबाबत दुमत आहे. वन मंत्री संजय राठोड यांचा याप्रकरणाशी संबंध असल्याच्या चर्चा समाज माध्यमांमध्ये होत आहेत. याशिवाय विरोधी पक्षातील नेत्यांनी देखील राठोड यांना दोषी धरले आहे. या घटनेनंतर संपूर्ण राज्यातील राजकरण ढवळून निघाले आहे. या मुद्यावरून विरोधी भाजप आक्रमक झाला असून त्यांनी राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तरुणीचे काही कॉल रेकॉर्डिंग पोलिसांच्या हाती लागले आहेत. या प्रकरणात पोलिसांवर राजकीय दबाव असून पूजाच्या मोबाईल आणि लॅपटॉपमधील अनेक गोष्टी दडवण्याचा प्रयत्न होत असल्याचा संशय भाजपने व्यक्त केला आहे.