वाशिममध्ये बीबीएफद्वारे पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी हजार रुपये अनुदान - वाशिम खरीप हंगाम पेरणी
बीबीएफ या यंत्राने पेरणी केली तर एकरी 8 किलो बियाणांची बचत होत असून, पावसाचा खंड पडला तरी ओलावा टिकून राहतो. त्यामुळे शेतकरी बांधवांनी रुंदसरी वरंबा पध्दतीने पेरणी करावी, असा सल्ला कृषी विभागाकडून देण्यात येत आहे.
वाशिम - जिल्ह्यात १४९ गावांमध्ये नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाची अंमलबजावणी सुरू आहे. या गावांमधील शेतकऱ्यांनी बिजोत्पादन व रुंदसरी वरंबा म्हणजेच बीबीएफ यंत्राद्वारे पेरणी केल्यास त्यांना प्रोत्साहनपर हेक्टरी एक हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ज्या गावाची नानाजी कृषी संजीवनी प्रकल्पात निवड झाली तेथील शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांनी केले आहे.
जिल्ह्यात खरीप हंगामात सर्वात जास्त सोयाबीनची पेरणी केली जाते. मात्र, शेतकरी पारंपारिक पध्दतीने पेरणी करीत असल्याने एकरी बियाणे जास्त लागत असून, उत्पन्न कमी होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी रुंदसरी वरंबा म्हणजेच बीबीएफ या यंत्राने पेरणी केली तर एकरी 8 किलो बियाणांची बचत होत असून, पावसाचा खंड पडला तरी ओलावा टिकून राहतो. त्यामुळे शेतकरी बांधवांनी रुंदसरी वरंबा पध्दतीने पेरणी करावी, असा सल्ला कृषी विभागाकडून देण्यात येत आहे.