वाशिम - वीजबिल न भरणाऱ्या शेतकऱ्यांची तुर्तास वीज कापली जाणार नाही, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अधिवेशनात केली होती. तरीही महावितरणच्यावतीने मालेगाव तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांची वीज कापण्यात आली आहे. परिणामी पाण्याअभावी पीकाचे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आमची कापलेली वीज पुन्हा जोडण्यात यावी, या मागणीकरीता मालेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी महावितरण कार्यलयाला घेराव घातला.
वीजबिल वसूलीसाठी वीजपुरवठा खंडित
कृषीपंप वीजबिल वसुलीसाठी महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी वीज पुरवठा खंडित करण्याची मोहीम सुरू केली आहे. काही ठिकाणी शेतकऱ्यांचे कनेक्शन तोडले जात आहे तर कुठे डीपीच बंद केला आहे. मालेगाव तालुक्यातील जाउळका परिसरात, मात्र या कारवाईमुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी थेट वीज कंपनीचे कार्यालय गाठले.
जाउळका रेल्वे परिसरातील शेतकऱ्यांनी आत्ताच भुईमूग पिकाची पेरणी केली आहे. मात्र, या पिकाला पाणी देण्यासाठी वीज नाही. त्यामुळे पेरलेल्या पिकाचे नुकसान होण्याची दाट शक्यता आहे. लवकरात लवकर वीज जोडणी करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.