वाशिम - राज्यात गौराईचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मात्र मागील दोन वर्षापासून कोरोना रोगाचे थैमान राज्यासह पूर्ण जगात पाहायला मिळत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील टाकळी येथील उपसरपंच किरण खाडे यांनी खास लसीकरणाचे महत्त्व पटवून देणारी कलाकृती साकारून गौराईची स्थापना केली आहे.
टाकळी गावात कोरोना लसीकरणाच्या देखाव्यात गौराईची स्थापना लसीकरणाची माहिती देणारा गौराईचा देखावा -
वाशिम जिल्ह्यातील टाकळी या 490 लोकसंख्या असून, गावात कोरोना लसीकरण 80 टक्के पूर्ण झाले आहे. मात्र अजूनही कोरोना लसीकरण विषयी नागरिकांमध्ये संभ्रम आहे. त्यामुळे कोरोना संदर्भात जनजागृती व्हावी यासाठी लसीकरणाची माहिती देणारा गौराईचा देखावा तयार केला आहे.
या उद्देशाने साकारला देखावा -
कोरोनाच्या महामारीमुळे महाराष्ट्रातील हजारो लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहे. मात्र कोरोनाच्या संसर्गजन्य रोगावर लसीकरण हा एक महत्वपूर्ण पर्याय असल्याचे शासनाने अनेक वेळा वेगवेगळ्या प्रकारे जनजागृती करून लसीकरण करण्याचे आवाहन केले आहे. मात्र ग्रामीण भागात लसीकरणाबाबत अनेक गैरसमज ग्रामीण भागातील मंडळींच्या मनात आहेत. त्यामुळे नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे यासाठी ही कलाकृती साकारली आहे, असा या मागचा उद्देश असल्याचे खाडे परिवाराने सांगितले आहे.
हेही वाचा -Gauri Festival : गौरींचे उत्साहात आगमन; 'अशी' आहे कोकणातील गौरी आगमनाची परंपरा