महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वाशिम : जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत राहणार सुरू - जीवनावश्यक वस्तूंची दुकाने उघडी राहणार

सर्व पेट्रोल पंपांचाही समावेश.. औषध विक्री करणारी दुकाने वगळली..

वाशिम
वाशिम

By

Published : Mar 25, 2020, 9:34 PM IST

Updated : Mar 25, 2020, 11:10 PM IST

वाशिम - कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी देशात २१ दिवसांसाठी कर्फ्यू लावण्यात आला आहे. त्याची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी जीवनावश्यक वस्तूंची विक्री करणाऱ्या दुकानांच्या वेळा निश्चित करणे आवश्यक असल्याने जिल्ह्यातील औषधी विक्री करणारी दुकाने, सर्व रुग्णालये वगळता इतर सर्व जीवनावश्यक वस्तूंची विक्री करणारी दुकाने, पेट्रोलपंप २६ मार्च २०२०पासून रोज सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंतच सुरू राहतील. त्यामुळे या कालावधीतच व एका घरातील शक्यतो एकाच व्यक्तीने खरेदीसाठी घराबाहेर पडावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी हृषीकेश मोडक यांनी केले आहे.

वाशिम
कर्फ्यू लागल्यानंतर नागरिकांना अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन करूनही अनेकजण त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. किराणा माल खरेदी, मेडिकलला जाण्याच्या बहाण्याने अनेकजण शहरात फिरताना दिसत असून त्यामुळे पोलीस यंत्रणेवर ताण येत आहे. या अनुषंगाने व्यापारी संघटना, किराणा माल विक्रेत्यांच्या प्रतिनिधींशी चर्चा केल्यानंतर जिल्हा प्रशासनाने जीवनावश्यक वस्तूंच्या वेळा निश्चित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व अन्नधान्य, किराणा, दूध, ब्रेड, फळे, भाजीपाला, अंडी, मांस, मासे या जीवनावश्यक वस्तूंची विक्री करणारी दुकाने व पेट्रोलपंप सकाळी ७ ते २ वाजेपर्यंतच सुरू राहतील. मात्र, औषध विक्री करणारी दुकाने, सर्व रुग्णालये नियामिपणे सुरू राहतील.

हेही वाचा -कोरोनाविरोधात लढणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना ४ महिन्यांचा आगाऊ पगार

कर्फ्यू दरम्यान गर्दी कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. नागरिकांनी घाबरून जावू नये. जिल्ह्यात जीवनावश्यक वस्तूंचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. तसेच व्यापाऱ्यांनी सुध्दा या वस्तूंचा साठा करू नये, अथवा या वस्तूंची चढ्या दराने विक्री करू नये. वस्तूंचा साठा अथवा चढ्या दराने विक्री केली जात असल्याचे आढळल्यास संबंधित व्यापाऱ्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही जिल्हाधिकारी श्री. मोडक यांनी यावेळी दिला.

‘कोरोना’ला पराभूत करण्यासाठी सहकार्य करा : जिल्हाधिकारी

कोरोना विषाणू संसर्गामुळे जगभरात अनेक बळी गेले आहेत. आपाल्या देशात, राज्यातही या विषाणूचा संसर्ग वाढत आहे. हा संसर्ग रोखण्यासाठी सर्वांनी काळजी घेणे व जबाबदारीने वागणे आवश्यक आहे. केंद्र, राज्य शासन, प्रशासन कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी पूर्ण क्षमतेने प्रयत्न करीत आहे. मात्र, प्रत्येक व्यक्तीने स्वयंशिस्त पाळून ‘कोरोना’ला पराभूत करण्यासाठी सहकार्य करणे आवश्यक आहे. त्यामुळे नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे. अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडू नये, अन्यथा पोलिसांना नाईलाजाने कठोर भूमिका घेवून कर्फ्यूची प्रभावी अंमलबजावणी करावी लागेल, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी हृषीकेश मोडक यांनी केले आहे.

हेही वाचा -'कोरोना विषाणूचा उगम चीनमध्ये झाला, यास पुरावा नाही' - चीनी दुतावास

Last Updated : Mar 25, 2020, 11:10 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details