वाशिम - कोरोनावर प्रभावी उपाय म्हणून लसीकरणावर भर दिला जात असून, यापुढे लसीचे दोन्ही डोस घेतल्याचे प्रमाणपत्र असेल तरच वाशिम येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयात कामानिमित्त प्रवेश मिळणार आहे. जिल्ह्यात सध्या कोरोना नियंत्रणात असला तरी धोका पूर्णपणे टळलेला नाही. राज्यात काही ठिकाणी कोरोना रुग्णांची संख्या हळूहळू वाढत असल्याने खबरदारीचा प्रयत्न म्हणून सर्वांनी योग्य ती दक्षता घेणे आवश्यक आहे. कोरोनापासून बचाव म्हणून लसीकरणावर भर दिला जात आहे. मात्र, अजूनही अनेकजण कोरोना प्रतिबंधक लस घेण्यास टाळाटाळ करीत असल्याने उपप्रादेशिक परिवहन विभागाने हा निर्णय घेतला आहे.
प्रमाणपत्र नसेल तर प्रवासावर बंदी -
लसीचे दोन्ही डोस घेतल्याचे प्रमाणपत्र व मास्कचा वापर असेल तरच कार्यालयात कामानिमित्त प्रवेश दिला जाणार आहे. ज्यांच्याकडे प्रमाणपत्र नसेल त्यांचे कोणतेही काम होणार नाही. लस घेतल्याचे प्रमाणपत्र नसेल तर प्रवास करता येणार नाही. प्रमाणपत्राशिवाय कोणत्याही प्रवासी वाहनातून प्रवास केल्यास संबंधित प्रवाशाला ५०० रुपये दंड आणि वाहनमालकाला १० हजार रुपये दंडाची तरतूद आहे.