वाशिम - सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणार्या तसेच नेत्रदान चळवळीचा जिल्ह्याचा ब्रॅन्ड अॅम्बेसेडर असलेल्या दिव्यांग चेतन उचितकर याने दानशुरपणाची पुन्हा प्रचिती दाखवून दिली आहे. त्याच्या चेतन सेवांकूर आर्केस्ट्राच्यावतीने पाल ठोकून राहणाऱ्या कुटुंबातील मुलांना अभ्यास करण्यासाठी दिपावली निमित्त सौर कंदीलाचे वाटप करण्यात आले.
जन्मतः अंध असलेला चेतन उचीतकर हा बालकलाकार आहे. आपल्या 16 दिव्यांग कलावंतांच्या सहकार्यातून चेतन सेवांकुर हा संगीतमय कार्यक्रम करतो. या कार्यक्रमाच्या माध्यमातून जो पैसा त्यांना मिळतो त्यातून त्याचा उदरनिर्वाह चालतो. अशा स्थितीतही चेतन उचीतकरकडून सौर कंदील वाटपासारखे विविध सामाजिक उपक्रम नेहमी राबविण्यात येतात.
चेतन सेवांकुर हा ग्रुपच्यावतीने मागील अनेक वर्षांपासून दीपावली निमित्ताने सौर कंदीलांचे वाटप करतो. यावर्षीही त्याने सौर कंदील वाटपाची परंपरा कायम ठेवली आहे. शेलू बाजार रस्त्याच्या कडेला गायरान जागेत पाल ठोकून काही कुटुंबे राहतात. या कुटुंबातील मुलांना अभ्यास करण्यासाठी सौर कंदील देण्याचे त्याने ठरविले. या कुटुंबातील मुले शाळाबाह्य आहेत. मात्र, त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी पोलीस विभागात कार्यरत असलेली संगीता ढोले नावाची एक आधुनिक सावित्री पुढे आली. तिने या मुलांना शिक्षण देण्याचे महान कार्य सुरू केले.